Friday, December 7, 2012

आस्थेचे बंध


मध्यंतरी रझा ऍकॅडमीने चालवलेल्या विरोध प्रदर्शनाच्या वेळेस मुंबईच्या आझाद मैदानावर जेव्हा तोडफोड झाली त्यात एक फोटो प्रामुख्याने आपल्या मनाला ठेच लावून गेला. आझाद मैदानावर असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला एक इसम तोडतानाचा तो फोटो होता. हा फोटो पाहून बऱ्याच जणांना राग आला असेल, व काहींना तर अगदी आताच ह्या इसमाला पकडून हाणायला पाहिजे असे वाटले असेल.
 
हुतात्मा स्मारकाला तोडतानाचे दृश्य आठवून आपल्या मनात कोलाहल सुरू झाला असेल. कोण असेल हा इसम? कोणी भारतीय नागरिक असे कृत्य करू धजेल का? हे कृत्य करताना त्याच्या मनात काय असेल? असे करणारा आपल्या देशाचा शत्रू तर नसेल? पाकिस्तानी तर नसेल? असे बरेच प्रश्न मनात येतात. नक्की काहीच माहिती नसते. हे कृत्य करणारा नक्कीच कोणीतरी राष्ट्रविरोधी इसम असणार. कारण राष्ट्रविरोधीच लोकं असे कृत्य करू शकतील व राष्ट्रविरोधी कृत्य करणारी लोकं म्हणजे आपले शत्रूच. असा विचार करून, आपणच आपले उत्तर शोधतो व उत्तर सापडले ह्या समाधानात त्यावेळे पुरते आपले मन शांत करतो.

 

मुंबईचे अमरज्योती किंवा हुतात्मा स्मारक पाडले तर आपल्याला का बरे इतके वाईट वाटले? आपण का बरे राष्ट्रद्रोही कृत्य म्हणून मनाला लावून घेतले? अरे, एवढे काय झाले, राग आला असेल, भावनांचा उद्वेग एवढा वाढला असेल की संयम राहिला नसेल, भावनाविवश होऊन रागाच्या भरात केलेले हे कृत्य, त्याच्यासाठी आपण कशाला एवढा त्रागा करून घ्यायचा. असे म्हणून स्वतःच्याच मनाला समजावून शांत का नाही बसलो?

 

आपल्यावर लहानपणा पासून वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार होत असतात. संस्कारांचे बाळकडू पाजण्यात आपले आईवडील अग्रेसर असतात, आणि लवकरच त्यात पालक, नातेवाईक, समाज, शाळेतील शिक्षक, मित्रगण, परिस्थिती असे अनेक संस्कार देण्यात भागीदार होतात.  

 

लहान असताना झालेल्या परिस्थितीच्या व समाजाच्या संगामुळे मिळालेल्या संस्कारातून व कळायला लागल्या पासून केलेल्या अभ्यासाने व अनुभवाने आपल्या आस्था दृढ होत जातात.  आपल्या आईवडीलांबद्दल, देशासाठी लढलेल्या व प्राणत्यागलेल्या व्यक्तींबद्दल, राष्ट्र, धर्म, आपल्या परिवाराशी निगडित वस्तूंबद्दल, चिन्हांबद्दल आस्था निर्माण होतात. मग काहींच्या आपल्या पूर्वीच्या ग्रंथांवर, हिंदूंच्या ॐ ह्या अक्षरावर, क्रिश्चनांच्या क्रॉसवर, सिखांच्या गुरुग्रंथसाहिब ग्रंथावर, मुसलमानांच्या चांदसिताऱ्यावर आस्था बसतात. कोणाला त्यांच्या परिवाराच्या चिजांवर आस्था असते, ही आस्था अगदी आजीच्या भिंग तुटलेल्या चश्म्या सारखी क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीत सुद्धा असू शकते, कोणाला त्यांच्या शिक्षकांवर, कोणाला फिजिक्सच्या पुस्तकांवर कोणाला बायबलवर कोणाला गीतेवर तर कोणाला इतर धर्मग्रंथांवर. अशा वेगवेगळ्या आस्था जडलेल्या असतात. प्रत्येकांच्या वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या आस्था काही ठिकाणी मात्र जुळून येतात व परमोच्च असतात. अशा परमोच्च आस्थांखातर वैयक्तिक आस्थांना तिलांजली द्यायची वेळ आली तरी ती दिली जाते. त्या म्हणजे राष्ट्र, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रीय संपदा व राष्ट्रगौरव चिन्हे. व्यक्तीच्या आवडीनिवडी निर्माण होण्यात आस्थेचा सहभाग मोठा असतो.

 

आस्थेचे बंध आपल्या आयुष्यात संयम राखण्यात मदत करतात व तुटता तुटत नाहीत. संसाराच्या भट्टीत व रोजच्या कामामुळे, आपण आस्थांमध्ये गुंतून राहत नाही, पण हृदयाच्या एका कोपऱ्यात आस्थांना योग्य ती जागा दिली गेलेली असते व अशा जतन केलेल्या आस्थांना दुखापत झाल्यास आपल्याला राहवत नाही, वाईट वाटते. आस्था जपण्यासाठी आपण फार काही करत नाही पण आपल्या मनाचा एक कोपरा त्या आस्थांमध्ये अडकलेला असतो. जर आपल्या आस्थांना धक्का लागला तर झालेली दुखापत न भरून निघणारी असते, एका प्रकारे त्या आस्थांशी निगडित असलेले तेवढे मन मरून जाते. वाईट वाटते.

 

आस्थेच्या बंधातून निर्माण झालेला संयम, आलेल्या रागावर मनावर काबू राखायला मदत करतो. कधी कधी घरी, नोकरीमध्ये वा बाहेर आपल्यावर असे प्रसंग येतात की, आपण अगदी जेरीला येतो. असे वाटते की सगळ्यांविरुद्ध  बंड करून उठावे. आपल्या भावना आपल्या हातात राहत नाहीत. अशा वेळेला आपण वाटेलते रागाच्या भरात करायला निघतो. पण नेमके अशाच वेळी आपल्या नकळत आपले आस्थेचे बंध आड येतात व आपण त्या धुमसत्या परिस्थितीत सुद्धा आपल्या आस्थांशी प्रतारणा करत नाही. आपल्या भावनांचा कितीही उद्वेग झाला तरी ह्या आस्था ढाली सारख्या आपल्या समोर उभ्या ठाकतात व त्यांना सांभाळता सांभाळता आपण आपल्या भावनांवर सहजच नकळत संयम ठेवतो. एवढेच नव्हे कधीकधी अशा आस्था आपले चित्त अपवित्र होऊ न देण्याचे काम करतात, त्यांना आपण चक्क कॉनसायनस् कीपर असे म्हणू शकू. ह्यालाच आस्थेचे बंध म्हणतात. ह्या आस्थेच्या बंधांपायी आततायीपणा कमी होतो, सारासार विचार करायला वेळ मिळतो, आपल्या मनाचा संयम कायम राहतो. ह्याचे एक उदाहरण म्हणजे काही गोष्टी आवडत नसल्या कारणाने आपल्याला राग येतो, घरी वादविवाद होतात, व रागाच्या भरात वाटेल ते करायचे व बोलायचे आपल्या मनात येते, तरी सुद्धा आपण वडीलधाऱ्यांचा मान राखायचा ह्या आस्थेच्या बंधामुळे वाटेल ते बोलत व करत नाही. आपल्या नकळत आपण दम धरतो व ह्याच कारणास्तव भांडणे पराकोटीला जात नाहीत, वादविवाद विस्फोटक बनत नाहीत व वातावरण निवळायला मदत होते. नाहीतर रस्त्यावरच्या शिवीगाळीच्या भांडणाचे चित्र आपल्या घराघरातून दिसले असते. सुसंस्कृतपणा ह्यालाच म्हणतात. सुसंस्कृत होण्यासाठी व तो टिकवण्यासाठी, आस्थेचे बंध खूप उपयोगी पडतात. जिथे आस्थेचे बंधच नाहीत तेथे सुसंस्कृतपणाचा लोप झाला असे समजायला हरकत नाही. आस्थेच्या बंधांमुळेच दोन माणसातली नाती टिकून राहतात. शिक्षक - विद्यार्थी, वडिलधारी माणसे व वयाने लहान. देव व भक्त, राष्ट्र व नागरिक. लोकसंग्रह करणारे नेते व त्यांचे अनुयायी. गुरू व शिष्य अशी अनेक नाती कठीण परिस्थितीत आस्थेमुळे शाबूत राहतात. आस्थेचे बंध नाती जडायला, टिकवायला व वाढवायला मदत करतात.

 

ह्याच आस्थेच्या बंधापायी एकलव्याने द्रोणाचार्यांना अंगठा दक्षिणा म्हणून दिला होता. ह्याच आस्थेच्या बंधा पोटी गुरु अर्जनसिंग व गुरू तेगबहादूरसिंगने स्वतःचे प्राण त्यागले होते. भारतवर्षात व हिंदू धर्मात रमणाऱ्या ह्याच आस्थेच्या पायी शिवाजीने हिंदूपतपातशाही प्रस्थापित केली. स्वराज्याच्या ह्याच आस्थे पायी लोकमान्य टिळक, दादाभाई नवरोजी, सावरकर व त्यांच्या बरोबरच्या अगणित क्रांतिकारकांनी, आपल्या देशासाठी जीवन अर्पिले. आपल्या सैन्यात, आपल्या युनिटवरच्या आस्थेपायी, आपल्या देशाच्या प्रेमापायी हजारो भारतीय सैनिक लढाईत प्राण देतात. गुरुदक्षिणेवर आस्था नसती तर अंगठा द्यायच्या ऐवजी एकलव्याने द्रोणाचार्यांना अंगठा दाखवला असता. आपल्या धर्मावर आस्था नसती तर गुरु अर्जन व गुरु तेगबहादूर कधीचे मुसलमान होऊन तेथेच त्यांची गोष्ट संपली असती. सिख धर्म उदयाला आलाच नसता, व हिंदूंचे संरक्षण अवघड होऊन बसले असते. शिवाजी, अदिलशहाच सरदार म्हणूनच राहिला असता व कदाचित आपले अस्तित्वच संपले असते.

 

स्वराज्याच्यावरच्या आस्थेनेच आपल्या स्वातंत्र्याचा पाया भरला गेला. ब्रिटिश वखारींविरुद्धचा राग धुमसत होता. १८५७ च्या सुमारास ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठीच्या उठावाची तयारी गुप्तपणे सुरू होती. पण काडतुसांना लागलेल्या गायीच्या चरबीचे आकस्मिक निमित्त होऊन उठावाच्या ठरलेल्या तिथीच्या आधीच मंगल पांडेने ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध उठाव केला. पुढचा इतिहास सर्वश्रृत आहे. आता काडतुसांना चरबी लागतेच. चरबी वापरणे काही गैर नाही. पण हिंदू मनाची आस्था गायीत. व मुसलमान लोक डुकराचे मास खात नाहीत. कुराणात तशी मनाई केलेली आहे, व कुराणावर असणाऱ्या नितांत आस्थेमुळे मुसलमानांना डुकराचे मास वर्ज्य असते. इथेही आस्था आड आली. मनं जुळून येणाऱ्या परमोच्च आस्थांशी जेव्हा खेळले जाते तेव्हा समाज एकत्र होऊन काय होते ते ह्या इतिहासातल्या उदाहरणाने बरेचसे स्पष्ट होते.

 

कालांतराने काही आस्था समाजमान्य होतात. वडिलधाऱ्या माणसांचा आदर करणे, देव, धर्म व देश ह्याच्यांशी निगडित चिन्हांचा आदर करणे अशा काही आस्थांचा समाजमान्य आस्था म्हणून उल्लेख करता येईल. आपल्या रोजच्या जीवनात आपण दुसऱ्या व्यक्तीची परीक्षा करताना, त्याला जाणून घेताना बाकीच्या गोष्टींबरोबर त्याच्या आस्था कशात आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न करतो. तारा जुळणे म्हणजे एक प्रकारे एकमेकांच्या आस्था जुळणेच असते. नाहीतर नाते कशाला म्हणायचे. जर कळत नकळत एकमेकांच्या आस्थांची सारखी पायमल्ली व्हायला लागली तर मग नाते कसे जुळणार. समाजमान्य व स्वतःच्या मनाला भावणाऱ्या आस्थांना अनुसरून आपण सहयोगी शोधतो. हे सगळे नकळत घडते. दोन व्यक्तींची केमिस्ट्री, त्यांची फ्रिक्वेन्सी, त्यांच्या तारा जुळणे ही सगळी नाती जुळल्याची रूपके आहेत. नाते जोडण्यात आस्थेचा असा सहभाग आहे. कृती करण्या मागचा एखाद्या व्यक्तीचा उद्देश्य, त्याने आत्मसात केलेल्या व समाजमान्य आस्थांना अनुसरून असाच असतो. आता खरे तर चित्रकला हा रेघांचा व रंगांचा एक सुंदर मिलाफ असतो. ह्या मिलाफातून साकारलेली चित्र बघणाऱ्याच्या मनाला उल्हसित करतात, व त्या कलाकृतीचा आस्वाद घेणाऱ्याला एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. पण कलेचा आस्वाद घेणारा, रसिक, त्याच्या आवडीनिवडीच्या भिंगातून आस्वाद घेतो. व्यक्तीच्या आवडीनिवडींवर त्याच्या आस्थांचा बराच प्रभाव असतो. त्यामुळेच सुंदर रेखाटने काढणाऱ्या एम एफ् हुसेनाला लोकांचा विरोध झाला. एम एफ् हुसेन ह्यांनी त्यांची कला जोपासण्यात असंख्य लोकांच्या समाजमान्य आस्थांना तिलांजली वाहिली होती. लोकांना म्हणून त्यांची कला आवडली नाही. निदान आपल्याकडे तरी. कशी आवडतील? प्रत्येक वेळेला चित्रांकडे बघताना रसिकांच्या आस्था दुखावल्या जायच्या. आता काहीएक शेकडो वर्षांनी जर लोकांची आस्था आपल्या देवी देवतांमध्ये राहिली नाही तर त्यावेळेला हीच एम एफ् हुसेनांची चित्रे लोकांना आवडतीलही व तेव्हाचा समाज त्या वेळेला म्हणेल "एम एफ् हुसेन आपल्या काळाच्या फार पुढे होता!". पण ती तेव्हाची गोष्ट झाली. काळ सापेक्ष, लोकांना चांगले वाटेल, मनाला भावेल व हृदयाला स्पर्श करेल, ती चांगली कला. ज्या कलेत आस्थांचा कुचकरा होणार असेल त्या कलेचा आस्वाद तर सोडाच पण तिटकारा मात्र येतो. जेव्हा महंमद खिलजी पासून औरंगजेब पर्यंत मुघल सल्तनतने हजारो मंदिरे जमीनदोस्त केली तेव्हा असंख्य भारतीयांचा आस्था दुखावल्या गेल्या. मुहंमद घोरीने अयोध्येचे रामजन्म मंदिर पाडले तेव्हा लोकांच्या आस्था दुखवणे हेच काय ते त्याच्या मनात होते. मुहंमद घोरीने स्वारी करून इथल्या समाजाच्या आस्था चिरडून त्यांच्या अस्मितेला तडा पोहचवला. जेता नेहमीच हरलेल्यांच्या आस्था, अस्मिता, इतिहास व भविष्य चुरगळून फेकून देतो.

 

ज्या राष्ट्रात नागरिकांच्या आस्था समर्थपणे जपल्या जातात ते राष्ट्र सार्वभौम राष्ट्र म्हणवू शकते. नाहीतर सार्वभौमीत्व नुसतेच नागरिक शास्त्रातल्या पुस्तकात लहान मुलांना समजवण्यासाठी राहून जाते. ह्या बरोबरच आस्थेचे बंध मनुष्याचा संयम राखण्यास मदत करतात व त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यास हातभार लावतात. घराघरातून व समाजात सुसंस्कृतपणा वाढवण्यासाठी आस्थेचे बंध जोपासले पाहिजेत.

 
राष्ट्रव्रत घेतले का. त्या बद्दल येथे वाचा

 


आणि येथे


 (मराठी ब्लॉग)

No comments:

Post a Comment